
सामना प्रतिनिधी । मुंबई
ज्या पोह्यांच्या साक्षीने लगीनगाठी जुळतात, त्या पोह्यांना आपल्या खाद्यसंस्कृतीत विशेष स्थान आहे. सकाळचा नाश्ता पोह्यांशिवाय अधुरा आहे. म्हणूनच पोहेप्रेमी दरवर्षी 7 जून हा ‘विश्व पोहे दिवस’ म्हणून साजरा करतात. आजही पोहे खाऊन, खिलवून आणि पोह्याची महती सांगून जगभरात हा दिवस उत्साहात साजरा झाला. ट्विटरवर तर जागतिक पोहे दिवस हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये राहिला.
पोहे महाराष्ट्रात जितके लोकप्रिय तितकेच देशभरातही आहेत. प्रांत कोणताही असो… कांदे पोहे असो वा बटाटे पोहे दडपे पोहे…करण्याची पद्धत भिन्न असली तरी जिभेचे चोचले पुरवण्याची चव मात्र बदलत नाही. म्हणूनच अस्सल पोहेप्रेमींनी जागतिक पोहे दिन साजरा करायला सुरुवात केली आहे. दिवसाचे औचित्य साधून आज चविष्ट पोहे मिळण्याची ठिकाणे आणि अनुभव सोशल मीडियावर शेअर झाले. पोह्यासंबंधी जोक्स आणि मिम्सही शेअर करण्यात आले.
पोह्यांना गमतीची फोडणी
सर्वात पहिला जागतिक पोहे दिवस 7 जून 2015 रोजी साजरा झाला. त्याचा नेमका प्रणेता कोण आहे हे सांगता येणार नाही. मात्र मॅगीच्या गुणवत्तेवरून वाद सुरू असताना नेमके ट्विटरवर गमतीने कुणी तरी पोहे दिवसाची संकल्पना मांडली आणि पोहेप्रेमींनी ती फार उचलून धरली. पोहे दिनाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.
फायदेच फायदे
पोहे खाण्याचे प्रमाण वाढले आहे. न्यूट्रीटीव्ह फूड म्हणून ओळखले जाते. सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ल्याने तुमचे पोट भरलेले राहते. काम करायला एनर्जी मिळते. मधुमेही रुग्णांना पोह्याचे सेवन फायदेशीर आहे. पोहे खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
























































