विश्वचषक नेमबाजी स्पर्धा; हिंदुस्थानी नेमबाजांची ऐतिहासिक कामगिरी, 30 पदकांसह अव्वल स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ)  यांच्या वतीने नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत यजमान हिंदुस्थानच्या नेमबाजांनी वर्चस्व गाजवले. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी हिंदुस्थानी खेळाडूंनी दोन सुवर्ण पदकांवर मोहोर उमटवली. हिंदुस्थानच्या नेमबाजांनी या स्पर्धेत 15 सुवर्ण, 9 रौप्य व सहा कास्य पदकांची कमाई केली. एकूण 30 पदकांवर नाव कोरणारा हिंदुस्थानी संघ पदकतालिकेत पहिल्या स्थानावर कायम राहिला. हिंदुस्थानची या स्पर्धेतील ही ऐतिहासिक कामगिरी ठरली हे विशेष. याआधी हिंदुस्थानला विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 30 पदकांची कमाई करता आलेली नव्हती.

हिंदुस्थानच्या महिला संघाने ट्रप प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. श्रेयसी सिंग, मनीष कीर व राजेश्वरी कुमारी यांचा सहभाग असलेल्या हिंदुस्थानी संघाने कझाकस्तानच्या मुलींना 6-0 अशा फरकाने धूळ चारत पहिल्या स्थानावर झेप घेतली. हिंदुस्थानच्या पुरुषांच्या संघानेही ट्रप प्रकारात सुवर्ण पदकावर हक्क सांगितला. कीनन चेनाई, पृथ्वीराज थोंडेमन व लक्ष्य शेरन या हिंदुस्थानी नेमबाजांनी स्लोवेकियाच्या नेमबाजांना 6-4 अशा फरकाने हरवत सुवर्ण पदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.

पुरुषांच्या गटात सुवर्ण हुकले

हिंदुस्थानला अखेरच्या दिवशी आणखी एक सुवर्ण पदक जिंकण्याची संधी होती, पण पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल या प्रकारात हिंदुस्थानच्या नेमबाजांना रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. गुरप्रीत सिंग, विजयवीर सिधू व आदर्श सिंग यांना अमेरिकन नेमबाजांकडून 2-10 अशा फरकाने हार सहन करावी लागली.