विराट कोहलीने दिले संघ बदलाचे संकेत, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवाचे पडसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने संघ बदलाचे संकेत दिले. कुठल्याही खेळाडूचं थेट नाव न घेता कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये योग्य मानसिकतेच्या खेळाडूंची गरज असल्याचे म्हटले आहे.

विराट कोहली म्हणाला, हिंदुस्थानी खेळाडूंनी विजयासाठी धावा करण्याची जिद्द दाखवली नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी संघाची खोलवर फलंदाजी आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला दिसतो. कसोटी क्रिकेटमध्ये याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मानसिकदृष्टय़ा कणखर असलेल्या योग्य खेळाडूंना संघात स्थान मिळायला हवे, असेही तो म्हणाला.

न्यूझीलंडच्या गोलंदाजीबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला, प्रतिभावान प्रतिस्पर्धी गोलंदाजांपुढे धावा कशा करायच्या यावर काम करण्याची आवश्यकता आहे. तांत्रिकदृष्टय़ा हिंदुस्थानी फलंदाजांमध्ये कमतरता नाहीये. फक्त प्रतिस्पर्धी गोलंदाजीपुढे बिनधास्त खेळण्यात कमी पडत असल्याने नैसर्गिक फलंदाजीला मर्यादा येतात. गोलंदाजांना वर्चस्व गाजविण्याची संधी मिळायला नको. खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ टिकून राहताना धावांची लयलूट व्हायला हवी. बाद होण्याच्या भीतीने फलंदाजी केली तर तुम्ही कधीच जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरू शकत नाही, असेही विराट कोहलीने सांगितले.

तीन सामने असायला हवे होते

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलआधी तीन कसोटी सामने असायला हवे होते, असे स्पष्टपणे सांगितले होते. आता या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली यानेही त्याच वक्तव्याची पुनरावृत्ती केली आहे. विराट कोहली म्हणाला, एका कसोटीच्या निकालावर सर्वोत्तम कसोटी संघ ठरू शकत नाही. दोन देशांमध्ये किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका व्हायला हवी होती.

चोहोबाजूंनी काैतुक

केन विल्यमसनच्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने हिंदुस्थानला पराभूत करून पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या जेतेपदाला गवसणी घातली. या देदीप्यमान व ऐतिहासिक विजयानंतर चोहोबाजूंनी केन विल्यमसन अॅण्ड पंपनीवर काैतुकांचा वर्षाव होऊ लागला आहे.