वरळीच्या अभ्यास गल्लीला नवी झळाळी; एलईडी दिवे, विद्यार्थ्यांसाठी फिरते शौचालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युवासेनेच्या प्रयत्नांमुळे वरळीच्या ऐतिहासिक अभ्यास गल्लीला नवी झळाळी मिळाली आहे. येथे अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उच्च दाबाचे एलईडी दिवे येथे बसवण्यात आले आहेत. याशिवाय फिरत्या शौचालयाचीदेखील सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवासेनेचे आभार मानले आहेत.

घरातील गोंगाट आणि कमी जागेमुळे वरळी बीडीडी चाळ आणि परिसरातील विद्यार्थी या अभ्यास गल्लीत अभ्यासासाठी येतात. वरळीमधील पोद्दार आणि कामगार रुग्णालयामधील ऐतिहासिक अभ्यास गल्लीत शिकून अनेक विद्यार्थी वकील, डॉक्टर, पोलीस अधिकारी शासनाच्या विविध उच्च पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल यादरम्यान विविध शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू होतात. त्या कालावधीत या अभ्यास गल्लीत अनेक मुले अभ्यास करण्यासाठी येतात. गल्लीची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली होती. युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना वरळी विधानसभा उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मुलांना रात्री अभ्यास करण्यासाठी उच्च दाबाचे एलईडी दिवे बेस्ट प्रशासनाकडून लावून घेतले आहेत. तसेच महापालिकेकडून या गल्लीत गतिरोधक टाकून सुशोभीकरण करण्यात आले. तसेच नो पार्किंगचे फलक आणि विद्यार्थ्यांसाठी फिरते शौचालय उपलब्ध करून दिली आहे. या कामासाठी नगरसेवक आशीष चेंबूरकर, माजी आमदार सुनील शिंदे यांचेही सहकार्य लाभले.

अभ्यास गल्लीत जुने दिवे असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येत होत्या. तसेच अभ्यासासाठी येणाऱया विद्यार्थ्यांसाठी शौचालयाचीदेखील सोय नव्हती. आता या अडचणी दूर झाल्या असून भविष्यात येथे अभ्यासासाठी येणाऱया विद्यार्थ्यांसाठी पाणपोईचीदेखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मागणीदेखील वाहतूक विभागाच्या सहपोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे, असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.