
पालिकेच्या जी/दक्षिण विभागासह परिसरातील नागरिकांना कोरोना लसीकरणाच्या सुविधेसाठी पोद्दार रुग्णालयात व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्या प्रयत्नाने हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
मुंबईत सध्या तिसऱया टप्प्याचे लसीकरण सुरू आहे. शिवाय पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येत आहे. मात्र वरळी विभागात मोफत लस मिळणारे केंद्र उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.
त्यामुळे नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्या पाठपुराव्याने आणि महापौर किशोरी पेडणेकर, प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, नगरसेविका हेमांगी वरळीकर, नगरसेवक समाधान सरवणकर, ऍड. संतोष खरात, नगरसेविका स्नेहल आंबेकर, नगरसेवक अरविंद भोसले यांच्या सहकार्याने हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचा फायदा वरळी, कोळीवाडा, लोअर परळ व परिसरातील नागरिकांना होणार आहे.
























































