Breaking – कुस्तीपटू सुशील कुमारला अटक, वीस दिवसांपासून होता फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रसाल स्टेडियमवर सुवर्णपदक विजेता ज्युनियर कुस्तीपटू सागर राणा हत्येप्रकरणी आरोपी असलेला हिंदुस्थानचा ऑलिम्पियन मल्ल सुशील कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये देशाला रौप्य व कांस्यपदक जिंकून देणारा सुशील कुमार 4 मे पासून फरार होता. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देणाऱयाला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

अशी घडली घटना…

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर सुशील कुमार आणि त्याच्या काही सहकाऱयांचा 4 मे रोजी ज्युनियर कुस्तीपटू सागर राणासोबत वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये दोन जण जखमी देखील झाले. त्यामध्ये सागरला जास्त मार लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मॉडेल टाऊन परिसरातल्या एका फ्लॅटवरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. कुस्तीपटू सागर राणाच्या हत्येप्रकरणात सुशील कुमारचे नाव आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला होता, मात्र तो तिथे नव्हता. त्यानंतर पोलिसांनी सुशील कुमारविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केले होते. त्यानंतरदेखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.