
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात रंगणार आहे. कानपूर कसोटी सामना अनिर्णित राहिल्यामुळे हिंदुस्थानचा संघ मुंबई कसोटी जिंकून मालिका नावावर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या लढतीत टीम इंडियाचा ‘रनमशीन’ विराट कोहली याचेही संघात पुनरागमन होत असल्याने संघाला बळ मिळणार आहे. यासह आणखी एक गुड न्यूज टीम इंडियासाठी असून कानपूर कसोटीत दुसऱ्या डावात झुंजार खेळी करणारा खेळाडू फिट झाला आहे.
कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात मानेच्या दुखापतीनंतरही यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धिमान सहा मैदानात उतरला होता आणि त्याने अर्धशतक ठोकत संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली होती. ही कसोटी अनिर्णित राहिली असली तरी सहाने ज्या पद्धतीने खेळ केला हे पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. परंतु मानेच्या दुखापतीमुळे तो मुंबईतील कसोटी खेळू शकणार की नाही असा सवाल उपस्थित होत होता. परंतु आता तो पूर्णपणे फिट झाला असून वानखेडेचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. याबाबत कर्णधार विराट कोहली याने माहिती दिली आहे.
मुंबई कसोटीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार विराट कोहली म्हणाला की, सध्या तो (ऋद्धिमान सहा) पूर्णपणे फिट आहे. मानेच्या दुखापतीतून तो सावरला असून पूर्णपणे ठिक झाला आहे. तसेच परिस्थितीचा अभ्यास करून संघ निवडला जाईल, असेही कोहली यावेळी म्हणाला. भिन्न परिस्थितीत यशस्वी खेळ करणारे बॉलिंग कॉम्बिनेशन निडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही विराट म्हणाला.
युवराज-हरभजनच्या ‘फिरकी’त अडकला किंग कोहली, सचिन तेंडुलकरचे धरले पाय
दरम्यान, कानपूर कसोटीच्या तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी ऋद्धिमान सहा यष्टीरक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्या जागी केएस भरत याने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. सहा दुखापतीतून सावरला नाही तर भरत हा मुंबई कसोटी खेळणार हे निश्चित होते. परंतु आता सहा फिट झाल्याने त्यालाच संधी मिळेल हे स्पष्ट झाले आहे.




























































