कोरोनाचा प्रसार हे चीनचे पाप, आजाराची माहिती देणाऱ्या डॉक्टरांना दिली होती धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या प्रसारामागे चीनच्या सरकारचे पाप आहे, ही बाब आता उघड होत आहे. चीनच्या एका महिला डॉक्टरच्या मुलाखतीनंतर समोर आली आहे. 15 डिसेंबर 2019 च्या सुमारास या व्हायरस संदर्भातील पहिला रुग्ण वुहान येथे समोर आला. त्या रुग्णावर उपचार करताना हा नवीन प्रकारचा जीवघेणा व्हायरस असून वेगाने संक्रमित होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती चीनच्या सरकारी विभागाला कळवून याप्रकरणी त्वरित उपया करण्यासाठी पाऊले उचलावी लागतील अशी माहिती दिली. मात्र चीनचे सरकार आणि अधिकाऱ्यांनी ही माहिती उघड करू नये अशी धमकी दिली. चीनच्या सरकारने तेव्हाच ही माहिती उघड करून खबरदारीच्या उपाय योजना केल्या असत्या तर कोरोनोला वेळीच रोखता आले असते असे डॉक्टरांचे स्पष्ट आहे.

वुहानमधून प्रसार झालेल्या कोरोना व्हायरसमुळे आता पर्यंत जगभरातील 1 लाख 22 हजार 926 संक्रमित झाले आहेत. तसेच आतापर्यंत 4595 लोकांचा मृत्यू झाला आहे. वुहानमधील ज्या डॉक्टरने या विषाणूची ओळख जगाला करून दिली त्या डॉक्टरचाही मृत्यू झाला आहे. काही जण बेपत्ता आहेत. कोरोना व्हायरस म्हणजे COVID 19 चा शोध घेणाऱ्या डॉक्टरांच्या टीममधील एक डॉक्टर आय फेन यांनी मोठा खुलासा केला आहे. डॉक्टर आय फेन यांनी सांगितले की, कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना माझ्या अनेक सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 2019 च्या डिसेंबर महिन्यात या व्हायरसवर संशोधन झाले आणि गंभीर माहिती मिळाली तेव्हा तातडीने सरकारी विभागाला याविषयी कळविण्यात आले. मात्र त्यांनी ही माहिती दडवली, तसेच माहिती उघड करू नये म्हणून डॉक्टरांना धमकी देखील देण्यात आली होती. डॉ. आय फेन यांनी चीन मधील रेवेन्यू नावाच्या मासिकाला मुलाखत देत ही माहिती उघड केली आहे. डॉ. फेन या स्वत: वुहानमधील सेंट्रल हॉस्पिटलच्या आपातकालीन विभागाच्या निर्देशक आहेत. आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर धमकी देण्यात आली की, माहिती उघड केल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोर जावे लागेल.

डॉ. फेन यांच्या सहकारी डॉ. ली वेनलियांग यांनी सरकारच्या आदेशाला न घाबरता सोशल मीडियावर ही माहिती उघड करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना तातडीने अटक करून जेलमध्ये धाडण्यात आले. अद्यापही त्यांची जेलमधून सुटका करण्यात आलेली नाही, असे देखील फेन यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. हा व्हायरस जगभरात इतक्या वेगाने पसरेल आणि इतक्या जणांचा जीव घेईल हे मला तेव्हाच लक्षात आले असते तर कोणत्याही परिणामांची चिंता न करता मी ही माहिती जगासमोर आणली असती. मात्र त्या क्षणी एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होईल असे जराही वाटले नव्हते, अन्यथा मला कुणी जेलमध्ये टाकले असते तरी देखील मी त्यांची चिंता न करता सत्य जगासमोर आणले असते, असेही त्यांनी म्हटले आहे. अर्थात मासिकात ही मुलाखत प्रसिद्ध होताच मासिकावर कारवाई करण्यात आली. इंटरनेटवरून मुलाखत उडवून देण्यात आली. मात्र काही चीनी नागरिकांनी या मुलाखतीचे स्क्रीन शॉट घेऊन ठेवले होते आणि सोशल मीडियावरून ते व्हायरल करण्यात आले. त्यामुळे ही मुलाखत जगासमोर आली आहे.

विशेष म्हणजे ही मुलाखत इमोजी आणि मोर्स कोडच्या भाषेत लिहून व्हायरल करण्यात आली आहे. टोनी लिन या प्रोड्युसरने ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. या मुलाखतीत डॉ. फेन म्हणतात की 30 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यांची लक्षणे सारखीच होती. त्यावेळीच लक्षात आले की हा व्हायरस वेगाने पसरत असून सार्स सारखा घातक कोरोना व्हायरस आहे. हा रिपोर्ट मी तयार करून सरकारी विभाग आणि अन्य रुग्णालयात पाठवला. डॉ. ली वेनलियांग यांनी सोशल मीडियावर हा रिपोर्ट टाकून कोरोना व्हायरस परसत असल्याची धोक्याची सूचना दिली. मात्र सरकारने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना तुरुंगात टाकले. मला देखील फोन करण्यात आला. आणि माहिती उघड करू नका असे धमकावले. 21 जानेवारी पासून अतिदक्षता विभागात सुमारे 1523 रुग्ण याच आजारानेग्रस्त असल्याने दाखल झाले होते. प्रतिदिन आकडा झपाट्याने वाढू लागला, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.