
महिलांमध्ये संस्कार आहेत म्हणून आतापर्यंत आम्ही तुमची थोबाडं फोडली नाहीत. आमच्या संयमाला कमजोरी समजू नका. महिला दुर्गेचे रूपदेखील धारण करू शकतात, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार सुरेद्र सिंग यांचा समाचार घेतला.
बलात्कार रोखण्यासाठी मुलीवर संस्कार करा असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले होते. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी भाजप आमदाराच्या वक्तव्याचा जोरदार शब्दात समाचार घेतला. भाजपच्या लोकांनी पहिले आपल्या पक्षातल्या लोकांना संस्कार शिकवावे. भाजपचे कित्येक नेते कित्येक केसेसमध्ये सापडतात. कोणाची सीडी बाहेर निघते तर काहींची इतर प्रकरणे बाहेर पडतात. महिलांनी कसे वागायचे ते आम्हाला शिकवू नये. आमच्यावर संस्कार आहेत म्हणून आम्ही सावित्री बनलो. रमाबाई बनलो. या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील तर माझ्याच जिह्यातल्या होत्या. आमच्यावर संस्कार आहेत, म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाहीत. आमच्या संयमाला आमची कमजोरी समजू नका. कोणीही महिला कमजोर नसते. महिला दुर्गेचे रूपदेखील धारण करू शकते. त्यामुळे खरे संस्कार आणि शिकवण ही महिलांपेक्षा पुरुषांना भरपूर देण्याची गरज आहे. महिलांचा मानसन्मान करण्याची शिकवण ही घरापासूनच सुरू होते. ती सुरू केली पाहिजे.
भाजपच्या या वायफळ व वाचाळवीरांना त्यांची जागा महिलांना मतदानाच्या दिवशी दाखवून द्यावी, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी तमाम महिलावर्गाला केले आहे.



























































