>> प्रसाद नायगावकर
तरुणाईमधील वाढती गुन्हेगारी हा यवतमाळ जिल्ह्यातील एक ज्वलंत प्रश्न बनू लागला आहे. परिणामी सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन लागत आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसावा म्हणून यवतमाळ शहर पोलिसांनी चक्क हमरस्त्यावरून आरोपींची वरात काढली आहे.
चोवीस वर्षांपूर्वी ‘सत्या’ नावाचा चित्रपट आला होता. यात मनोज वाजपेयी यांनी भिकू म्हात्रे या गुन्हेगाराचा रोल अतिशय ताकदीने उभारला होता . तसेच यवतमाळ जिल्ह्यात भिकू म्हात्रेसारखे गुन्हेगार अगदी गल्लोगल्ली झाले आहेत. यवतमाळ वाशिमचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी शून्य प्रहरात लोकसभेत यवतमाळच्या वाढत्या गुन्हेगारी संदर्भात प्रश्न उपस्थित करून चिंता व्यक्त केली आहे.
यवतमाळ येथे पशुखाद्य विक्रेत्यासह व्यवस्थापकावर तलवारीने हल्ला करून दीड लाख रुपयांची रोकड उडविल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेतील दोन आरोपींना नेर येथील एका गोठ्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर यवतमाळ शहरातील मुख्य बाजारपेठेतून त्या दोन्ही आरोपींना यवतमाळ शहर पोलिसांनी चक्क पायदळ फिरवीत त्यांची वरात काढली आणि या आरोपीना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. डमरू उर्फ पवन राऊत, निखिल शेलोटे असं या आरोपींचे नाव आहेत .
या आरोपींच्या वराती संदर्भात पोलिसांना विचारणा केली असताना गाडी ऐनवेळी खराब झाल्याने या आरोपीना पायदळ पोलीस स्थानकात नेले असल्याचे त्यांचे म्हणणे. कारण कोणतेही असो पण या गुन्हेगारांची भरवस्तीतून वरात निघाल्यामुळे गुन्हेगारीवर कुठेतरी वचक बसेल अशी सर्वसामान्य प्रतिक्रिया देत आहेत.