कर्नाटक भाजपचे येडियुरप्पा यांनी ‘विश्वास’ जिंकला! विधानसभाध्यक्षांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
yeddyurappa

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकातील मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सरकारने आज बहुमत सिद्ध केले. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले. सरकारच्या बाजूने 106 मते मिळाली तर विरोधात 100 आमदारांनी मतदान केले. यामुळे कर्नाटकातील राजकीय नाटय़ आता संपले आहे. काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आणि त्यांचा गेल्या आठवडय़ात 26 जुलैला शपथविधी झाला. त्यांना आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

बहुमताचा आकडे 105
विधानसभा अध्यक्षांनी रविवारी 14 बंडखोरांना निलंबित केले. यापूर्वी 3 बंडखोरांना निलंबित केले होते. यामुळे 225 आमदार असलेल्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठीचा आकडा 105 वर आला. भाजपकडे 105 संख्याबळ आहे. एका अपक्ष आमदाराने पाठिंबा दिला. त्यामुळे संख्याबळ 106 झाली.
मतदानात येडियुरप्पा सरकारच्या बाजूने 106 मते पडली. काँग्रेसच्या 66 आणि जेडीएसच्या 34 अशा 100 आमदारांनी विरोधात मतदान केले.

रमेश कुमार यांचा राजीनामा; नवीन अध्यक्षांची उद्या निवड
विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी आपला राजीनामा दिला. आता बुधवारी (दि. 31) नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे.

सूडाचे राजकारण नाही
गेले 14 महिने कर्नाटकातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पडली होती. आता या यंत्रणेला पुन्हा रुळावर आणावे लागेल. मी सूडाचे राजकारण करणार नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले.