‘मीच पुन्हा येणार’ या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यात अंहकार ; काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केले. या भाषणात त्यांनी मणिपूरसह अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. तसेच विरोधकांवर टीकाही केली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दहा वर्षांमध्ये केलेली कामे सांगितली. काँग्रेसच्या काळात देश भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या विळख्यात अडकला होता, असा आरोपही त्यांनी केला. तसेच पुढील वर्षी ध्वजारोहणासाठी आपण पुन्हा येणार, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी नक्की ध्वजारोहण करतील पण तो कार्यक्रम त्यांच्या घरी होईल. जे सत्तेवर असतात त्यांना हे वाटतच असतं की आपण पुन्हा निवडून येऊ. पण तुम्ही जिंकणार की हरणार हे सर्वस्वी मतदारांच्या हाती असतं. मतदार तुम्हाला काय कौल देतात? त्यावर सगळं अवलंबून आहे. मीच पुन्हा येणार या वक्तव्यात नरेंद्र मोदींचा अहंकार दिसून येतो. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही त्यांनी विरोधकांवर टीका केली. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी देश कसा एकसंध ठेवणार असा सवालही खरगे यांनी केला.

काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनीही मोदी यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांना अद्याप वेळ आहे. त्या निवडणुकीत कुणाला कौल द्यायचा, हे जनता ठरवेल. त्यानंतरच कोण पुन्हा येईल की नाही हे ठरेल. माझं पंतप्रधान मोदींना सांगणं आहे किमान 2024 च्या निवडणुकीची आणि त्यानंतरच्या निकालांची तरी वाट बघा.

2014 मध्ये मी तुम्हाला परिवर्तन घडेल असे आश्वासन दिले होते. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवले. 2019 मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. आता 2024 साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या 15 ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, जिंकेन. मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. असे वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढच्या टर्ममध्येही आपणच पंतप्रधान होणार असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या याच वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.