
पुण्यासह राज्यभरात प्रसिध्द असलेल्या ‘येवले चहा’साठी लागणारे प्रीमिक्स पावडर व चहा मसाला बनविणाऱ्या कोंढवास्थित कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापा टाकला. यावेळी विविध त्रुटी आढळून आल्या असून अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कंपनीला तात्काळ उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने तब्बल 6 लाखांचा साठा जप्त केला असून त्याचे नमूने राज्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
येवले चहामध्ये आरोग्यास धोकादायक असलेला ‘मेलानाईट’ पदार्थ वापरला जात असल्याच्या संशयावरून ही तपासणी करण्यात आली. यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येवले चहा विक्रेता यांना चहा पावडर, चहा मसाला व साखर हे साहित्य पुरविणाऱ्या त्यांच्याच कोंढवा येथील उत्पादन केंद्रावर मंगळवारी छापा टाकला. छापा कारवाईदरम्यान तेथे चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे पॅकेट आढळून आले. या पॅकेटची तपासणी केली असता त्याच्या आतमध्ये कोणता अन्नपदार्थ आहे? त्यात कुठले घटक आहेत? याची माहिती पॅकेटवर नव्हती. अन व सुरक्षा मानदे कायद्यानुसार या पॅकेटवर लेबल लावणे बंधनकारक आहे.
तसेच उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी एका तज्ञ व्यक्तीची नेमणुक करणे गरजेचे असताना याचेही उल्लंघन झाले. या परिसरात पेस्ट कंट्रोल करण्यात आलेले नव्हते. तर, पदार्थांची गुणवत्ता तपासणी प्राधिकृत प्रयोगशाळेकडून करून घेणे बंधनकारक असताना ती केली नसल्याचे आढळून आले. पेस्ट कंट्रोल, कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी नसल्याचेही समोर आले आहे. तर, पॅकींग पदार्थ योग्य आहेत की नाही याची माहिती देणारा पुरावा नव्हता. आदी कारणामुळे कंपनीला पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात अताले आहेत.
…जाहीरातीवरून दिशाभूल, प्रशासनाकडून नोटीस
येवले चहासाठी मिनरल वॉटर वापरले जात असून, चहा प्यायल्यावर पित्त होत नाही अशा प्रकारची ग्राहकांची दिशाभुल करणारी जाहिरातही करण्यात येत असल्याचे एफडीएच्या तपासणीतून समोर आले आहे. याप्रकरणी एफडीने नोटीस बजावली असून अधिकृत कारवाईसाठी सल्ला घेण्यात येत आहे. तर, चहाच्या पदार्थाचे वितरण करण्याचे काम अन्वी डिस्ट्रीब्युटर्स, कात्रज ही कंपनी करत असून त्यांच्याकडे विक्रीचा परवाना नाही. याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
येवले चहा विक्रेत्यांना चहासाठी लागणारे साहित्य पुरविणाऱ्या कोंढवा येथील ‘येवला फुड प्रॉडक्ट’ पेढीची तपासणी केली. यावेळी उत्पादकाकडून अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचा भंग झाल्याचे दिसून आले. लेबल ऍक्टचा भंग, तज्ञ व्यक्तीची नेमणुक न करणे, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नसणे आदी त्रुटी आढळून आल्याने उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले आहे. पुढील कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.
अल्पावधीमध्ये चहाप्रेमींमध्ये मनामध्ये स्थान मिळवणारा पुण्यातील प्रसिद्ध ‘येवले अमृततुल्य’ चहा अडचणीत आला आहे. ‘येवले अमृततुल्य’ चहाच्या चहा पावडर आणि चहाच्या मसाल्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली आहे. pic.twitter.com/o4UL7Gax7V
— Saamana (@Saamanaonline) September 24, 2019


































































