येवलेंच्या चहा पावडरीत भेसळ, कृत्रिम रंगाचा वापर केल्याचा तपासणीतून उघड

2111

संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होत चाललेल्या येवले Yewle चहाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणीसाठी पाठवले होते. या तपासणीमध्ये येवले चहाच्या पावडरीमध्ये कृत्रिम रंग आढळल्याचे दिसून आले आहे. टारट्राझाईन नावाचा कृत्रिम रंग या पावडरीत मिसळला जात असल्याचं तपासणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. अन्न सुरक्षेच्या मानकानुसार हा रंग चांगला नसून तो आरोग्याला अपायकारक ठरू शकतो असं अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तपासणीचा हा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला आहे.

‘येवले अमृततुल्य’चे उत्पादन थांबलेले नाही, विरोधकांनी अफवा पसरवल्या! – नवनाथ येवले

 

सप्टेंबर 2019 मध्ये कात्रजमधल्या येवलेच्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने धाड टाकली होती. यावेळी त्यांना चहा पावडर, चहा मसाला आणि साखर हे येवले या ब्रँडच्या नावाखाली उत्पादीत आणि पॅकबंद केले जात असल्याचं दिसून आलं होतं. या उत्पादनांवर उत्पादनाची तारखी आणि त्याची मुदत संपण्याची म्हणजे Expiry Date नमूद केलेली नव्हती जे कायद्याला धरून नाहीये. उत्पादनांची अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अधिकृत तपासणीशाळेत चाचणीही करण्यात आली नव्हती असंही त्यावेळी स्पष्ट झालं होतं. या कारखान्यातून जमा केलेले नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.

चाचणीचा पहिल्या अहवालात पदार्थ तयार करण्याच्या मानकांचे उल्लंघन झाले नसल्याचं उघड झाले होते. मात्र या निष्कर्षाबाबत अन्न आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय होता. अन्न आणि औषध विभागाचे पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की अहवालाबाबत समाधानी नसल्याने प्रशासनाने नमुने चाचणीसाठी केंद्र सरकारच्या मैसूर इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

FSSAI ने तयार केलेल्या नियमानुसार चहामध्ये रंगाच्या वापराची परवानगी नाही. येवले चहामध्ये तो आकर्षक दिसावा यासाठी रंग वापरण्यात येतो असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. काही रंग हे खाण्यायोग्य असतात आणि त्यांच्यामुळे अपाय होत नाही. हे रंग मिठाई किंवा फळांचा ज्युस बनवताना मिसळले जातात. मानकानुसार हे रंग वापरण्याची परवानगी आहे मात्र ती चहासाठी देण्यात आलेली नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने येवले चहाच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला होता. त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की अशी भेसळ होणं शक्य नाहीये. आम्ही अन्न सुरक्षा मानकांचे आणि सुरक्षेसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करतो. प्रवक्त्यांनी सांगितले की अन्न आणि औषध प्रशासनाने आमच्या कारखान्यावर धाड टाकलेली होती. त्यावेळी गोळा केलेल्या नमुन्यांची चाचणी झाली होती ज्यातून काहीच निष्पन्न झालं नव्हतं. मैसूर इथे नमुने पाठवल्याचे आणि त्याच्या अहवालाबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या