गिफ्टच्या नावाखाली तरुणीची फसवणूक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर ठगाने गिफ्टच्या नावाखाली तरुणीची फसवणूक केली आहे. 6 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी कुरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तरुणी ही मालाड परिसरात राहते. तरुणीचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. गेल्या महिन्यात तरुणीला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रीक्वेस्ट आली. ती रीक्वेस्ट तरुणीने स्वीकारली. ठगाने आपण जर्मनी देशाचे नागरिक असल्याचे भासवले. आज आपला वाढदिवस असून भरपूर गिफ्ट घेतले आहे. त्यापैकी एक गिफ्ट तुला पाठवायचे असल्याच्या त्याने भूलथापा मारल्या. गिफ्टसाठी पत्ता विचारला. त्या गिफ्टमध्ये सोन्याच्या वस्तू आणि परदेशी चलन असल्याचे तरुणीला सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी तरुणीला एका कुरियर पंपनीतून पह्न आला. जर्मनी येथून एक पार्सल आले आहे. ते पार्सल हवे असल्यास टॅक्सच्या स्वरूपात काही रक्कम द्यावी लागेल, असे तिला सांगण्यात आले. त्या कुरियरमध्ये पैसे असून ते पोलिसांना समजल्यास कारवाई करतील अशी भीती दाखवली. भीतीपोटी तरुणीने पैसे भरले. त्यानंतर पुन्हा तरुणीला एकाचा पह्न आला. त्यानेदेखील पोलीस कारवाईची भीती दाखवून पैसे उकळले. तरुणीला भीती दाखवत ठगाने तिच्याकडून 6 लाख 30 हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली.