तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या दोघांना अटक, दत्तवाडी पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी रात्री अकराच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ घडली.

मनोज उर्फ मन्या दिनेश मेरवाडे (रा. दांडेकर पुल) आणि ऋतिक शरद सोनवणे (वय 19, रा. दत्तवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आकाश देवरूखे (वय 22, रा. दांडेकर पुल) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आकाश आणि ऋतिक एकमेकांच्या ओळखीतील असून एकाच परिसरात राहायला आहेत. आकाश आणि कोथरूडमधील मित्र अनिल शिंदे दांडेकर पुलानजीक रिक्षात बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या मनोज आणि ऋतिकने आकाशला शिवीगाळ केली. त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले होते.

पोलिसांनी त्यांना शोध घेऊन अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, प्रमोद भोसले यांनी केली .