ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. अमन पवन झा असे त्याचे नाव आहे. अपघातप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

अमन हा पोयसर येथे कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याला एक मोटारसायकल विकत घ्यायची होती. त्यामुळे अमन हा त्याच्या नातेवाईकांसोबत बुधवारी दुपारी चिंचोली बंदर येथे आला होता. अमनने एका शोरूममधून सेकंड हॅण्ड मोटारसायकल विकत घेतली होती. मोटारसायकल विकत घेतल्यानंतर तो घरी जात होता. चिंचोली बंदर परिसरात अमनच्या मोटारसायकलला ट्रकने धडक दिली. त्या धडकेत तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताच्या घटनेची माहिती समजताच बांगूरनगर पोलीस घटनास्थळी आले. अमनच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस त्या ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.