डीजेच्या मोठ्या आवाजाने हृदयविकाराचा झटका, 18 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठ्या आवाजात ढाणढाण करत वाजवला जाणारा डीजे हा मानवी शरीरासाठी घातक असतो. याचा प्रत्यय नुकताच मध्य प्रदेश येथे आला आहे. वरातीत डीजेवर नाचणाऱ्या एका 18 वर्षांच्या तरुणाचा आवाजाच्या तीव्रतेमुळे मृत्यू झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे घडली आहे.

उज्जैननजीक अम्बोदिया डेम येथे राहणारा लाल सिंह नावाचा तरुण त्याचा मित्र विजय याच्या लग्नासाठी ताजपूर येथे गेला होता. विजयची वरात त्याच्या गावाहून निघत होती. तेव्हा लालसिंह वरातीत डीजेसह नाचत होता. या दरम्यान तो मोबाईलवर व्हिडीओही बनवत होता.

अचानक नाचता नाचता तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्याला उज्जैन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी लालसिंह याला मृत घोषित केलं.

शवविच्छेदन अहवालात लालसिंह याच्या हृदयात रक्त साकळल्याचं दिसून आलं. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हे घडून आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. जेव्हा डीजेचा आवाज मोठा होतो, तेव्हा शरीरात वेगवेगळे बदल होतात. अधिक डेसिबलचा आवाज मानव शरीरासाठी घातक असतो. त्याचा परिणाम मेंदू आणि हृदय दोन्हींवरही होतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.