भरधाव कार दुभाजकावर आदळून एक तरुणी ठार, तर तिघे गंभीर जखमी

वेगात असलेल्या स्विफ्ट कारवरून नियंत्रण सुटल्याने नागपूर येथील लॉ कॉलेज चौकाजवळ झालेल्या अपघातात एक तरुणी ठार, तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना 20 फेब्रुवारीला मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास घडली. बरखा हरीश खुराणा असे मृत तरुणीचे नाव आहे.

शांतीनगर हद्दीत एलजी 29, व्हीएचबी कॉलनी येथे राहणारे प्रेम अशोक चंदनानी (20) हे त्यांचे नातेवाईक बरखा हरीश खुराणा (24), लकी हरीश खुराणा आणि रिया जगन्नाथ खुराणा यांच्यासह अमरावती रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पार्टी साजरी करण्यास गेले होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी परत जात होते. प्रेम चंदनानी हा त्याची एमएच 28/एएन 1726 क्रमाकांची मारुती स्विफ्ट चालवत होता. रात्रीच्या सुमारास रस्ता मोकळा असल्याने त्यांची कार वेगात होती.

मध्यरात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या दरम्यान त्यांची कार लॉ कॉलेज चौकाच्या जवळ सुरभी गर्ल्स हॉस्टेलजवळ येताच प्रेमचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वेगात असलेली कार रस्ता दुभाजकावर आदळली. मध्यरात्रीच्या वेळी मोठा आवाज आल्याने लोक बाहेर आले. तेव्हा त्यांना अपघात झाल्याचे दिसले. लोकांनी याबाबत अंबाझरी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारमधील चौघांनाही कारच्या काचा फोडून बाहेर काढले. या अपघातात कारचा चुराडा झाला. कारचा वेग इतका होता की, कारमध्ये बसलेले चौघेही गंभीर जखमी झाले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बरखाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर तिघांना उपचारासाठी न्यूरॉन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. बरखा खुराणा ही एका सायकल व्यावसायिकाची मुलगी होती. याप्रकरणी प्रेम चंदनानी याच्याविरुद्ध निष्काळजीपणे कार चालवून अपघात केल्याप्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या