
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
विमान प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांमध्ये एक महत्त्वाचा कागद म्हणजे बोर्डिंग पास. मात्र आता विमान प्रवास करण्यासाठी हा बोर्डिंग पास लागणार नसून तुमचा चेहराच तुमच्या बोर्डिंग पासचं काम करणार आहे. मात्र, ही सुविधा फक्त डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी लागू असणार आहे.
विमानतळ प्राधिकरण प्रवाशांसाठी कागदरहित प्रवेश देण्याच्या विचारात आहे. त्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या प्रणालीत फेस रेक्गिनिशन हे प्रमुख फीचर असणार आहे. त्यामुळे प्रवाशाचा चेहराच त्याचा बोर्डिंग पास होणार आहे. ही सुविधा दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू या चार प्रमुख विमानतळांवर बसवण्यात येणार असून हळूहळू या सुविधेचा विस्तार केला जाणार आहे.
माणसाचा चेहरा हा एक सर्वात वेगळा असा बायोमेट्रिक इंडिकेटर आहे. चेहरा स्कॅन करतेवेळी चेहऱ्याच्या विविध भागांनुसार त्याच्या प्रतिमा घेतल्या जातील. त्यानुसार चेहरा व्यवस्थित स्कॅन करून मगच प्रवेश दिला जाईल. जर एखाद्याचं कपाळ झाकलेलं असेल किंवा अपघातामुळे चेहऱ्यावर काही जखम झाली असेल तरीही ही प्रणाली चेहरा व्यवस्थित ओळखू शकते. फक्त त्यासाठी प्रत्येक प्रवाशाला दर पाच वर्षांनी आपलं ताजं छायाचित्रं अपडेट करावं लागेल.
summary- your face became boarding pass at airport


























































