
सामना प्रतिनिधी । लातूर
उदगीर शहरात बेकरीत काम करीत असलेल्या ३० वर्षीय तरुणाने हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारला. त्याने बनावट कागदपत्रे गोळा करून पासपोर्टही तयार करून घेतला आहे. हा प्रकार उघडकीला येताच दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्याला अटक केली आहे. नरसिंग जयराम भूयकर उर्फ मोहम्मद रेहमान इबनेआदम असे त्याचे नाव आहे.
नरसिंग भूयकर यांने मुस्लिम धर्म स्विकारताच मोहम्मद रेहमान इबनेआदम असे नाव बदलून मुस्लीम तरुणीशी विवाह केला. दहशतवादविरोधी पथकाने तरुणाचा बनावट पासपोर्ट जप्त करून त्याला अटकही केली आहे. मुळचा बीदर जिल्ह्यातील जहीराबाद येथील नरसिंग जयराम भूयकर हा ३० वर्षीय तरुण कामधंद्याच्या निमित्ताने काही वर्षापूर्वी उदगीर (जि.लातूर) येथे आला होता. उदरनिर्वाहासाठी तो उदगीर येथील एका बेकरीत काम करीत होता. त्याने हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्विकारला. त्याने पासपोर्टसाठी धर्मांतर केलेल्या नव्या कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यास सुरुवात केली. त्यासाठी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून घेतले. या सर्व कागदपत्रांच्या आधारे त्याने बँकेत खातेही काढले.
एका एजंटमार्फत पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज केला. यामध्ये त्याने वडिलांचे नाव इबनेआदम तर आईचे नाव मोहम्मद अवलियाबी अशी खोटी माहिती भरली होती. पोलीस पडताळणीत अर्जात नमूद करण्यात आलेला पत्ता खोटा आढळून आला. त्याचा अर्ज रद्द करण्याचा अहवाल उदगीर पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयास दिला होता. लातूर येथील एका एजंटाला हाताशी धरून पीपी फॉर्म भरून नवा पत्ता दिला. त्याप्रमाणे पासपोर्टही तयार करून घेतला. हा तरुण दक्षिण आफ्रिकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यापूर्वीच दहशतवादीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक डाबेराव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने उदगीरमध्ये धाड टाकून आरोपीला अटक केली आहे.
























































