गणपतीपुळे समुद्रात मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय वर्षे २६ राहणार मानखुर्द मुंबई) असे त्याचे नाव आहे. तर भीमराज आगाळे (वय वर्षे २४ राहणार कल्याण) आणि विवेक शेलार (वय वर्षे २५, राहणार विद्याविहार मुंबई) येथील या दोन तरुणांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक, जीवरक्षक, पोलीस व ग्रामस्थ यांना यश आले आहे.

मुंबई येथून आदर्श धनगर राहणार, प्रफुल्ल त्रिमुखी ,सिद्धेश काजवे, भीमराज आगाळे व विवेक शेलार हे पाच कॉलेजमध्ये मित्र देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे सकाळच्या सुमारास आले होते. गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉज मध्ये निवासासाठी उतरले होते. यावेळी या तरुणांनी दुपारनंतर समुद्रात आंघोळीसाठी जाण्याचे ठरवले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी ते समुद्रात पोहत होते. त्याचवेळी त्यांच्यातील प्रफुल्ल त्रिमुखी, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या तीन तरुणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला असता ते बुडू लागले. त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला असता समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिक व जीवरक्षक यांनी समुद्रात उडी घेऊन या तिन्ही तरुणांना समुद्राच्या पाण्याबाहेर काढले. त्यानंतर तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता प्रफुल्ल त्रिमुखी हा मृत झाल्याचे घोषीत केले. तर भीमराज आगाळे आणि विवेक शेलार यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तर मृत झालेल्या प्रफुल्ल त्रिमुखी याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुनीता पवार आणि अमोल पणकुठे यांनी सांगितले. तसेच मयत झालेल्या प्रफुल्ल त्रिमुखी याच्या कुटुंबियांना सदर घटनेबाबत कळविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेबाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.