पारध येथे वीस वर्षीय तरुणाचा खून, अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पारध

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथे बुलढाणा जिल्ह्यातील मासरुळ येथील स्वप्नील श्रीरंग भुते (२०) या महाविद्यालयीन तरुणाचा अज्ञात व्यक्तीने दगडाने व लाकडी फळीने निघृन खुन केल्याचे आढळुन आले. पारध पोलीसानी घटना स्थळी जावून रितसर पंचनामा केला आहे. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान १४ जुन रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भोकरदन ते पारध रोडवर राजर्षी शाहु महाविद्यालयापासुन अर्धा कि.मी.अंतरावर ग.नं 242 पारध शिवारात श्रीरंग दगडु सुरडकर यांच्या शेतातील बाधांवर निंबाच्या झाडांच्याखाली अज्ञात व्यक्तीचे मृतदेह असल्याची माहिती प्रभु दामुसुरडकर यांनी पारध पोलिसांना दिली. सदर माहितीवरून पारध पोलीस ठाण्याचे स.पो.नि.शंकर शिंदे, स.फौजदार उबाळे, पो.ना.प्रकाश शिनकर, माळी, सरदार,दिनेश पायघन, नागरे,जाधव, रानगोते, भालके आदी पथकाने रात्री जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असता सदरील युवकाला लाकडी फळी व दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे आढळून आले. त्याच्या खिशात सापडलेल्या काही कागद व आधार कार्डावरून हा तरुण बुलढाणा जिल्ह्यातील मासरुळ येथील स्वप्नील श्रीरंग भुते आहे, असे समजले.

या प्रकरणी पोलीस तपास करत असून आरोपीला शोधण्यासाठी श्वान पथकलाही पाचारण करण्यात आले आहे. पारध पोलिसांनी विविध पथके तयार करून तपासकामी रवानगी केले आहे. पारध पोलीसानी अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास स.पो. नि.शंकर शिंदे हे करीत आहे.