
शासकीय पदांचे कंत्राटीकरण, आरोग्य सुविधांअभावी नांदेड येथे झालेल्या रुग्णांचे मृत्युकांड व ‘शाळा दत्तक योजने’बाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ युवा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोंची होळी करण्यात आली. यावेळी पोलीस व कर्यकर्त्यांत झटापट झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
सरकारने शासकीय पदांचे कंत्राटीकरण, शाळा दत्तक योजना, छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे औषध व आरोग्य सुविधांअभावी निष्पाप रुग्णांचे झालेले मृत्युकांड या विरोधात तीक्र असंतोष असून, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध करत जिल्हा परिषदेजवळ युवा महासंघाच्या वतीने घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोंची होळी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असतानाही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शासननिर्णयांची होळी केली.
शिंदे, फडणवीस आणि शासनाच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी वातावरण तणावपूर्ण बनले होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांना निवेदन देण्यात आले. ऍड. अनिल वासम, अशोक बल्ला, रफिक काझी, बाळकृष्ण मल्याळ, मुधकर चिल्लाळ, अप्पाशा चांगले, नरेश गुल्लापल्ली, सन्नी कोंडा, दिनेश बडगु, राहुल बुगले, राकेश म्हेत्रे, संतोष बोडा यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.






























































