
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘भारत माता की जय’ असे नारे देणे म्हणजे राष्ट्रवाद असा अर्थ होत नाही. आपल्या सर्वांसाठी ‘जय हो’ चा नारा हीच राष्ट्रभक्ती आहे. धर्म, जातीयवाद आणि शहरी-ग्रामीण भेदभाव या गोष्टींपासून दूर राहा, असा सल्ला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांना दिला. युवकांनी समाजातील अनिष्ट प्रथा, कट्टरता या विरोधातील लढाईत सर्वात पुढे असायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिल्ली विद्यापीठातील एका कार्यक्रमात नायडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
भ्रष्टाचार, निरक्षरता, भीती, भूक आणि जातीवादापासून मुक्त असलेल्या ‘नव्या हिंदुस्थान’ च्या निर्मितीवर युवकांनी लक्ष केंद्रीत करावे असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवाद म्हणजे भारत माता की जय म्हणणे नव्हे. जय हो म्हणणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. जर धर्म, जाती आणि शहरी-ग्रामीण विभाजनाच्या आधारे जनतेशी भेदभाव करत असाल तर तुम्ही ‘भारत माता की जय हो’ असा नारा देऊ शकत नाही, असेही नायडू म्हणाले. युवकांनी समाजातील अनिष्ट प्रथा, कट्टरता या विरोधातील लढाईत पुढे असायला हवे आणि लैंगिक समानता आदी गोष्टींना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जे स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवतात आणि उत्तम जीवनासाठी धाडस, चिकाटी आणि क्षमता दाखवतात, त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे, असेही ते म्हणाले. समृद्ध हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी आणि रामराज्याची सुरुवात करण्यासाठी युवकांनी प्रयत्न केला पाहिजे, असेही नायडू म्हणाले.


























































