चंद्रावर सापडली रहस्यमय झोपडी, शास्त्रज्ञांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रावर वातावरण नाही हे तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण, तरीही चंद्रावर एक रहस्यमय आकृती सापडली आहे. चीनच्या युतू-2 या रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर एक रहस्यमय आकृती दिसली आहे.

चीनच्या अवकाश संशोधन विभागासोबत काम करणाऱ्या विज्ञानाशी संबंधित चॅनल अवर स्पेसमध्ये ही माहिती दाखवण्यात आली आहे. युतूने चंद्राच्या उत्तर दिशेच्या क्षितिजावर एक घनाकृती वस्तू पाहिली. अवर स्पेसने या आकृतीचं नामकरण शेनमी जियाओवू अर्थात रहस्यमय झोपडी असं केलं आहे.

हे नाव सांकेतिक आहे, कारण अद्याप ही वस्तू किंवा आकृती नेमकी कशाची आहे, याचा शोध लागलेला नाही. पुढील काही दिवसांत रोव्हरला त्याच्या क्रेटरमधून बाहेर काढून या रहस्यमय आकृतीच्या नजीक जाण्याचा प्रयत्न होणार आहे.

शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, ही रहस्यमय आकृती एखाद्या मोठ्या खडकाचा तुकडा असू शकते. अर्थात जोवर रोव्हर त्याच्या जवळ जाऊन फोटो काढत नाही, तोवर निश्चित काहीच सांगता येणार नाही, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.