
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्यावतीने (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेला बसलेल्या मुंबईतील काही विद्यार्थ्यांना पुणे येथील परीक्षाकेंद्र देण्यात आले. याप्रकरणी युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून मिळाले. तर मुंबई सेंट्रल येथील नायर रूग्णालयाच्या सुमारे 400 डॉक्टरांचे कॅण्टीनअभावी खाण्याचे वांदे झाले आहेत. हे शिकाऊ डॉक्टर राहत असलेल्या हाजीअली येथील वसतिगृहातील कॅण्टीन दोन वर्षांपूर्वी बंद झाले. आणि आता नायर रूग्णालयातील कॅण्टीनची सेवादेखील बंद पडली असून या डॉक्टरच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी युवा सेनेने नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातांची भेट घेऊन निवेदन दिले.
सीईटी सेलचा भोंगळ कारभार, मुंबईतील विद्यार्थ्यांना पुण्यात परीक्षा केंद्र
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्यावतीने विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया सीईटी परीक्षेला मुंबईतील काही विद्यार्थ्यांना पुणे येथील परीक्षाकेंद्र दिले आहे. एमबीए अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसलेल्या काही विद्यार्थ्यांना पुणे येथील परीक्षाकेंद्र अलॉट करण्यात आले आहे. तसेच सीईटी सेलच्या कार्यालयात येणाऱया विद्यार्थी, पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी हेल्प डेस्क आहे. मात्र येथे कर्मचारीच उपलब्ध नाहीत. सीईट सेलच्या या भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना माजी सिनेट सदस्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली.
मुंबई राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी सीईटसाठी पुण्यातील परीक्षाकेंद्र अलॉट झाले आहे. याप्रकरणी काही विद्यार्थी, पालकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे याविषयी तक्रार केली. या तक्रारीनुसार युवासेना माजी व्यवस्थापन परीषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी आधी सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच या विद्यार्थ्यांना मुंबईतच परीक्षाकेंद्र देण्याची मागणी केली. सीईटी सेलचे आयुक्त वारभुवन यांनी युवासेनेच्या पत्राची दखल घेत अशा विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्र बदलून देण्यात आले.
सीईटीसाठी परीक्षा अर्ज भरताना परीक्षाकेंद्रासाठी विद्यार्थ्यांने किमान चार पर्याय देणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांनी मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पुणे असे चार पर्याय भरले. मात्र काही विद्यार्थ्यांना पहिले तीन पर्याय सोडून चौथ्या क्रमांकावर असलेले पुणे केंद्र देण्यात आले. परीक्षा केंद्राकरीता चार पर्याय देण्याची सक्ती असल्यामुळे नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना चौथ्या पर्यायाच्या जागी पुणे केंद्राचा पर्याय द्यावा लागला.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे लेखी तक्रार
सीईटी सेलमधील कारभाराप्रकरणी युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शीतल देवरूखकर-शेठ यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली. याप्रसंगी आमदार विलास पोतनीस, सुनील शिंदे हेदेखील उपस्थित होते.
शिकाऊ डॉक्टरांचे खाण्याचे वांदे; हाजीअली वसतिगृह, रुग्णालयातील कॅण्टीन सेवा बंद
मुंबई सेंट्रल येथील नायर रूग्णालयाच्या सुमारे 400 डॉक्टरांचे कॅण्टीनअभावी खाण्याचे वांदे झाले आहेत. हे शिकाऊ डॉक्टर राहत असलेल्या हाजीअली येथील वसतिगृहातील कॅण्टीन दोन वर्षांपूर्वी बंद झाले. आणि आता नायर रूग्णालयातील कॅण्टीनची सेवादेखील बंद पडली आहे. त्यामुळे या डॉक्टरांना अत्यावश्यक सेवेवेळी साधा चहा आणि कॉफीदेखील मिळणे कठीण झाले आहे. पोटाची भूक भागविण्यासाठी या डॉक्टरांना रूग्णालयाच्या बाहेर शोधाशोध करावी लागत आहे.
नायर रुग्णालय येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱया वसतिगृहातील जवळपास 400 डॉक्टरांचे मागील दोन वर्षापासून कॅन्टीन अभावी खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने रूग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.प्रविण राठी आणि डॉ.सारिका पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. कोरोना काळापासून वसतिगृहातील कॅण्टीन बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांना कॅण्टीनची पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली. मात्र या कॅण्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि महाग खाणे मिळत होते. अखेर काही काळानंतर हे कॅन्टीन देखील बंद झाले. त्यामुळे अत्यावश्यक काळात सेवा देणाऱया या डॉक्टरांना उत्तम दर्जाचे व खिशाला परवडेल, असे खाणे उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली.
युवासेनेच्या शिष्टमंडळात युवासेना कार्यकारी सदस्य सिद्धेश धाऊसकर, माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, युवासेनेचे पदाधिकारी हेमंत दुधवडकर, मुकेश कोळी, डॉ.सतीश नरसिंग, डॉ.शरिवा रणदिवे, अभिनव वाघ, ओंकार पाटील, रोहित देशमुख, ज्ञानप्रकाश तिवारी, अक्षय देसाई, विशाल कपाडिया, ऋषी साळवे, राहुल यादव उपस्थित होते. चर्चेअंती असे निदर्शनास आले की महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे प्रशासन मनमानी कारभार करीत आहेत तरी यावर तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त आयुक्त आरोग्य डॉ.संजीव कुमार यांची भेट घेणार आहोत, असे प्रदीप सावंत यांनी सांगितले. या भेटीनंतरही न्याय न मिळाल्यास मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे दाद मागू, असेही सावंत म्हणाले.



























































