निवड प्रक्रिया होऊनही मुंबई विद्यापीठातील महत्त्वाची पदे रिक्त, तातडीने नियुक्त्या करण्याची युवासेनेची मागणी

मुंबई विद्यापीठात बऱयाच काळापासून कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी, दूरस्थ शिक्षण विभाग संचालक ही पदे रिक्त आहेत. या पदांचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱयांच्या हातात आहे. या पदांवर पूर्णवेळ अधिकाऱयांची नेमणूक करा, या मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने प्र. कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे यांना देण्यात आले.

वित्त व लेखा अधिकारी यांची निवड प्रक्रिया 3 फेब्रुवारी तर कुलसचिव यांची निवड प्रक्रिया 4 फेब्रुवारी रोजी पार पडली. तीन आठवडय़ांनंतरही या पदांवर नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. मागील अनेक महिन्यांपासून विद्यापीठाचा कारभार प्रभारी अधिकारी त्यांच्या वेळेनुसार चालवत आहेत. याप्रकरणी युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे यांना निवेदन देऊन त्वरित नेमणुका करण्याची मागणी केली तसेच दिरंगाईबाबत विचारले असता कोणतेही ठोस उत्तर दिले नाही.

विद्यापीठाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी या नियुक्त्या लवकरात लवकर करा, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. तसेच पुन्हा एकदा नियुक्त्यांसाठी विद्यार्थ्यांच्या पैशांवर जाहिरात, मुलाखत घेण्याचा विद्यापीठाचा विचार तर नाही, असा सवाल उपस्थित करीत याविषयी कुलपतींना जाब विचारण्याचा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे.