पूल दुर्घटनेचा परीक्षांवरही परिणाम, युवा सेनेमुळे टळले विद्यार्थ्यांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अंधेरीत पुलाचा भाग कोसळल्यामुळे सतत धावत असणाऱ्या मुंबईला ब्रेक लागला आहे. रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही या घटनेचा परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात पावसाची भर पडल्याने मुंबईकरांची दैना उडाली आहे. पुल दुर्घटनेचा परीक्षांवरही परिणाम झाला असून विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांना अनेक विद्यार्थी पोहोचू शकलेले नाहीत. पण, सुदैवाने युवासेनेने विद्यापीठाकडे फेरपरीक्षेची मागणी केल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान टळलं आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या अनेक महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेतील एम. एससी. प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, मंगळवारी सकाळीच झालेल्या अंधेरी पुलाच्या दुर्घटनेमुळे अनेक विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये पोहोचू शकले नाहीत. जे विद्यार्थी पोहोचू शकलेले नाहीत, अशांची फेरपरीक्षा घेण्याची मागणी युवासेनेने विद्यापीठाकडे केली आणि ती त्वरित मान्यही करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टळलं आहे.