
नगर शहरात जीवघेण्या हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. अशातच मंगळवारी रात्री युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्या चुलत भावाला मारहाण करत डोक्यावर पिस्तुल ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे.
या घटने संदर्भात आदित्य राठोड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आदित्य संजय राठोड (वय 25, रा. नेता सुभाष चौक, तोफखाना, नगर) हे त्यांच्या पत्नी प्रिशा राठोड यांच्यासह पुण्यातून नगरला कारने येत होते. त्यांची कार कायनेटिक चौकात आली असता मागून आलेल्या लाल रंगाच्या कारने ओव्हरटेक केले. ही कार राठोड यांच्या कारला आडवी उभी राहिली.
कारमध्ये चार अज्ञात व्यक्ती होत्या. त्यातील दोन जण खाली उतरले आणि त्यांनी राठोड यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राठोड यांनी शिवीगाळीचे कारण विचारताच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच डोक्यावर पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असे फिर्यादीत म्हणण्यात आले आहे. या घटनेचा शिवसेनेकडून सोशल मीडियावर निषेध सुरू आहे.
नगर शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत चालल्या आहेत. मागील महिन्यामध्ये या शहरामध्ये दोन खून झाले आहेत. विशेष म्हणजे भांडणाच्या घटना या सातत्याने वाढू लागल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत आता तत्काळ उपयोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.



























































