वरळीच्या दफनभूमीच्या दुरुस्तीसाठी पालिका देणार 1 कोटीचा निधी युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळीतील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीतील दफनभूमीची दुरुस्ती आता लवकरच होणार आहे. महापालिका प्रशासनाने दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून ते प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. मंजुरी मिळताच दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात येईल, असे महापालिकेने कळवले आहे. युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी यासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

वरळीतील माता रमाई स्मशानभूमी ही मुंबई महापालिकेची सर्वात मोठी स्मशाभूमी आहे. या स्मशाभूमीमध्ये असलेल्या दफनभूमीची दुरवस्था झाली आहे. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये दफनभूमीच्या दुरवस्थेबद्दल शुक्रवारी बातमी प्रसिद्ध झाली होती. तातडीने दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा युवासेनेने दिला होता. याची तात्काळ दखल घेऊन परिमंडळ 2चे उपायुक्त प्रशांत सपकाळे, साहाय्यक आयुक्त जी-दक्षिण संतोषकुमार धोंडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी दफनभूमीच्या दुरुस्ती कामासाठी एक कोटीचे अंदाज पत्रक तयार केले आणि तो प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीकरिता पाठवला आहे. मंजुरी मिळताच दफनभूमीचे काम सुरू करण्यात येईल, असे लेखी पत्र युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांना देण्यात आले आहे.