
नेपाळमध्ये Gen Z नी रस्त्यावर उतरत सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र हाती घेतले आणि सरकार उलथवलं. त्यानंतर फ्रान्समध्येही Gen Z रस्त्यावर उतरले होते. याआधी बांगलादेशमध्येही तरुणांनी आंदोलन करत शेख हसीना यांची सत्ता उलथवली होती. आता Gen Z मेक्सिकोमध्येही रस्त्यावर उतरले आहेत. मेक्सिकोमधील वाढती गुन्हेगारी, वाढलेला भ्रष्टाचार व सरकारविरोधात Gen Z नी आंदोलन पुकारलं आहे.
मेक्सिको सिटीच्या रस्त्यावर शनिवारी अचानक हजारो तरुण जमले. हातात फलक, चेहऱ्यावर संताप आणि वेगवेगळ्या घोषणा देत त्यांनी आंदोलन सुरू केलं. Gen Z नीच या आंदोलनाचे नेतृत्व केले. मेक्सिकोमधील वाढती गुन्हेगारी, वाढलेला भ्रष्टाचार व सरकारविरोधात तरुणांनी हे आंदोलन पुकारलं आहे. तरुणांचं हे आंदोलन पाहून विरोधी पक्षांचे नेते व वृद्ध नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले. पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस व आंदोलकांमध्ये चांगलीच जुंपली.
आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर आंदोलक आणखी आक्रमक झाले. काही ठिकाणी आंदोलकांनी थेट पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे या आंदोलनात हिंसाचारही झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीहल्ल्या केला. त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यात यश आले.
आंदोलक म्हणाले, आम्हाला आमच्या देशात सुरक्षा हवी आहे. देश अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त व्हावा, भ्रष्टाचारापासून आपली सुटका व्हावी यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही शासकीय आरोग्य व्यवस्थेसाठी निधी आणि सुरक्षिततेची मागणी करत आहोत. सध्या डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण नाही. समुद्री चाच्यांच्या झेंडा (कवटी व तलवारीचं चित्र असलेला काळा झेंडा) घेऊन मास्सा या आंदोलनात सहभागी झाले होते. हा झेंडा आता मेक्सिकोमधील जेन-झी आंदोलनाचा झेंडा बनला आहे.

























































