जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसची एकमेकांना मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील हिसारमध्ये जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने एकमेकांना मदत केल्याचे बोलले जात आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या जननायक जनता पक्ष म्हणजेच जेजेपीच्या विरोधात या दोन पक्षांनी हातमिळवणी केल्याचे दिसून आले आहे. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत भाजप समर्थक उमेदवार विरुद्ध जेजेपीचा समर्थक उमेदवार अशी सरळ लढत होती. दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी 18 नगरसेवक होते आणि 6-7 नगरसेवकांनी भाजप आणि जेजेपी या दोन्ही पक्षांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. काँग्रेस पक्षाकडे अवघे 4 नगरसेवक आहेत. भाजपला भीती होती की जेजेपी पक्ष बाजी मारू शकतो. यामुळे भाजपने निवडणुकीपूर्वी सगळी जुळवाजुळव करत या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठीची तयारी पूर्ण केली होती.

भाजपचा पाठिंबा असलेल्या सोनी कुमार यांनी जेजेपीचा पाठिंबा असलेल्या सुनील कुमार यांचा 2 मतांनी पराभव केला. सोनी कुमार यांना 16 मते मिळाली तर सुनील कुमार यांना 14 मते मिळाली. जिल्हा परिषदेत अवघे 4 नगरसेवक असलेल्या काँग्रेसने आपला उपाध्यक्ष निवडून आणला असून काँग्रेसच्या रीना यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी मोहित यांनाही 2 मतांनी पराभूत केले. रिना यांना 16 मते मिळाली तर मोहित यांना 14 मते मिळाली.

हिसार जिल्हा परिषदेची निवडणूक इतकी महत्त्वाची होती की त्यात जेजेपी पक्षाचे प्रमुख आणि हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला उर्जामंत्री रणजीत चौटाला यांनी स्वत: लक्ष घातलं होतं. रणजीत चौटाला यांच्या स्वीय सहाय्यकाने काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये समन्वय साधण्याचे काम केले होते आणि प्रत्येक घडामोडींचे वृत्तांकन तो रणजीत चौटाला यांना करत होता. या निकालानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष भूपेंद्र वीरचक्र यांनी आनंद व्यक्त केला असून निवडून आलेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.