‘झेडपी’ नव्याने बदल्यांचे वेळापत्रक करणार !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनगणनेच्या कामासाठी यंदा बहुतांश जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिल्याने त्यांच्या बदली प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. यावर्षी सरकारच्या सूचनेनुसार जनगणनेचे काम दिले जाणार नसल्याने आरोग्य, महिला बालकल्याण व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. या बदल्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून नव्याने बदल्यांचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने 2027 च्या जनगणनेचे देशव्यापी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल. तर 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना केली जाणार आहे. दरम्यान, या पाश्र्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील जनगणना कामाशी संबंधित ‘क’ आणि ‘ड’ वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषद शिक्षकांची यंदा बदली न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामविकास विभागाने तसे पत्र सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. जनगणना कामाशी संबंधित ‘क’ आणि ‘ड’ वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व शिक्षक यांची सन 2026 ची बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा परिषदेने जनगणनेशी संबंधित कर्मचारी वगळून बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी 6 ते 8 मे दरम्यानचे वेळापत्रक जाहीर केले होते.

दुसरीकडे जिल्हा परिषदेने जिल्हा प्रशासनाकडे कोणते कर्मचारी जनगणनेशी संबंधित आहेत, याची माहिती मागवली होती. यातील बहुतांशी माहिती जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध झाली आहे. यात माहितीनुसार जिल्ह्यात आरोग्य विभाग, महिला बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया होणार आहे. या विभागातील एकाही कर्मचाऱ्याला जनगणनेचे काम देण्यात आलेले नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या बदल्या राबवण्यात येणार आहेत. या बदल्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बदल्यांमधून गुरुजींची सुटका

दरवर्षी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा विषय गाजत असतो. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची ११ हजार पदे कार्यरत आहेत. दरवर्षी यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने बदली होत असते. गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या या ऑनलाइन पद्धतीने होत असून, यंदा जनगणनेच्या कामासाठी बहुतांशी शिक्षकांच्या ऑर्डर झालेल्या आहेत