झायडसच्या Virafin ला डीसीजीआयची मंजुरी; कोरोनाविरोधातील लढाईला मिळणार बळ

देशभरात कोरोनाचा फैलाव वाढव आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला गती देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील ड्रग्स रेग्युलेटरने (डीसीजीआय) कोरोनाशी लढण्यासाठी Zydus च्या Virafin ला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळणार आहे.

Virafin चा उपयोग कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी करण्यात येणार आहे. डीसीजीआयने शुक्रवारी Virafin च्या वापराला मंजुरी दिली आहे. चाचण्यांमध्ये याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या औषधाच्या वापरामुळे सात दिवसात 91.15 टक्के कोरोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा झायडसने केला आहे. तसेच याच्या वापराने कोरोनाबाधितांचा त्रास कमी होतो आणि कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात हे औषध दिल्यास रुग्ण कोरोनावर लवकर मात करू शकतात. तसेच त्यांचा त्रासही खूप कमी होणार आहे.

सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णांना हे औषध देण्यात येणार आहे. हे सर्व रुग्णालयातही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कंपनीने देशातील 25 केंद्रावर या औषधाच्या चाचण्या केल्या होत्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. औषध घेतल्यानंतर सातच दिवसात रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तसेच त्यांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनाचा देशभरात झपाट्याने फैलाव होत आहे. गेल्या दोन दिवसात 6 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस हा एकमेव उपाय आहे. सध्या देशभरात कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या लस देण्यात येत आहेत. तसेच रशियाची स्तुतनिक व्ही देशील लवकरच उपलब्ध होणार आहे.

देशभरात 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. आता डीसीजीआयने Virafinला मंजुरी दिल्याने कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या