अभिप्राय: आयुष्यातल्या ऊन-पावसाच्या कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>राहुल गोखले

भोंगळा पाऊस’ हा जयदीप विघ्ने यांचा कथासंग्रह. एकूण सव्वीस कथा यात समाविष्ट आहेत. या सर्व कथांमध्ये साम्य हे की त्या कथा माणसाच्या सुख-दुःखाचे चित्रण प्रभावी पद्धतीने करतात.

भोंगळा पाऊस याचा अर्थ ऊन पडलेले असतानाच आलेला पाऊस. याच नावाच्या कथेत लेखकाने माधव आणि वैशाली यांच्या संसारातील विखारांचे दर्शन घडवले आहे. शिक्षण चांगले असूनही पैसे देऊन नोकरी करायची नाही या धोरणामुळे मीनाक्षीशी न झालेला विवाह, मग वैशालीशी झालेले लग्न, सततच्या माधवच्या मोठय़ा भावाशी माधवची वैशालीने केलेली केलेली तुलना, वैशालीला आपल्या दिराच्या आर्थिक स्थितीविषयी वाटणारा सुप्त मत्सर आणि त्यावरून आपल्याला सतत हिणवणे आणि या सगळ्यामुळे माधवला आलेली उद्विग्नता या कथेत लेखकाने चितारली आहे. जुन्या आठवणींत रमलेले असतानाच अचानक वेदना देणारे वास्तव समोर यावे म्हणून त्याची तुलना लेखकाने भोंगळ्या पावसाशी केली आहे. प्रस्तुत पुस्तकातील बहुतांशी कथा या या सूत्राशी जोडलेल्या आहेत.

‘कडुनिंब’ ही विश्वास आणि सुमती यांच्या जुळून आलेल्या, पण मग तुटलेल्या गाठींची कथा आहे. सुमतीच्या संसाराचा उडालेला बोजवारा तर विश्वासचा फुललेला संसार याचे प्रभावी चित्रण लेखकाने या कथेत केले आहे. ‘वर्ग दुसरा’मधील रायभान आणि मंगला यांचा मुलगा गणेश याला जिह्याच्या ठिकाणी एका इंटरनॅशनल स्कुलमध्ये मिळालेला प्रवेश; त्यासाठी शेळ्या विकून उभा केलेला पैसा; मात्र शाळेत प्रवेशासाठी गेलेले असताना रायभान आणि मंगलाला आलेला कटू अनुभव, यापेक्षाही आपल्या आई-वडिलांचा झालेला अपमान पाहून गणेशने गावच्याच शाळेत प्रवेश घेऊ म्हणून सांगण्यातील समजूतदारपणा हे सगळे प्रत्ययकारी पद्धतीने लेखक रंगवतो. आपल्या वृद्ध आजारी बापाला मरण का येत नाही, असा उद्वेगाने विचार करीत असलेल्या दिनकरला वृद्ध नर वानरामागे लागलेल्या तरण्या वानरांच्या हल्ल्यातून आपल्या त्या उद्वेगामधील फोलतेचा कसा साक्षत्कार होतो याचे चित्रण लेखकाने ‘म्होरक्या’ या कथेत केले आहे. संसारात कोलमडून पडण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या वसंताला त्याचे पूर्वीचे शिक्षक लढण्याचे बळ कसे देतात यावर वसंता’ ही कथा बेतलेली आहे. ‘कडका’, ‘काळटोकी’, ‘माडी’, ‘दोखणी’, ‘ईपीतर’, ‘खंडय़ा’ इत्यादी कथादेखील वाचनीय.

या सर्व कथांच्या काही वैशिष्टय़ांचा उल्लेख अवश्य केला पाहिजे. साऱया कथांचा भाव शीर्षकात पकडणे सोपे नसते. पण या कथांची शीर्षके ही अगदी नेमकी आहेत. ज्या पात्रांची योजना लेखकाने कथांमध्ये केलेली आहे ती पात्रे सामान्य आयुष्य जगणारी आहेत; पण त्यांना आलेले अनुभव हे कधी विचित्र, कधी वैषम्य आणणारे, कधी आशा निर्माण करणारे, कधी आनंदाच्या झुळकेचा अनुभव देणारे, कधी खदखद निर्माण करणारे, कधी निराशेच्या गर्तेत ओढणारे, कधी पश्चात्ताप करायला लावणारे, कधी अवघडलेपण आणणारे तर कधी धडा देणारे असेच आहेत. अशा वेळी या कथांतील पात्रे वाचकाला अगदी जवळचीच वाटायला लागतील यात शंका नाही. आयुष्यातील ती क्षणभंगुरता शब्दांत पकडण्याची किमया लेखकाला साधली आहे.
विघ्ने यांच्या या कथासंग्रहाने एका आश्वासक कथालेखकाची ग्वाही दिली आहे. यापुढेही त्यांच्याकडून अशाच कथांची अपेक्षा हा संग्रह उत्पन्न करतो. संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठ वेधक.

भोंगळा पाऊस
लेखक : जयदीप विघ्ने
प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठs : 128, मूल्य : रुपये 250/-