
सध्या भोंग्यांचे राजकारण तापत आहे. मात्र, साहित्यिकांनी हे लक्षात ठेवावे की राजकारण्यांचा भोंगा सत्तेचा असेल तर साहित्याचा भोंगा सत्याचाच असला पाहिजे, असे प्रतिपादन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज येथे केले.
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने धनवटे नॅशनल कॉलेज येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानाहून बोलत हाते.
भारतासह वर्तमानातील जागतिक वातावरण अतिशय हिंसक झालेले असून, जगाला हिंसेने ग्रासले आहे. युव्रेन मरतोय, माणसे मारली जात आहेत, रक्त सांडले जात आहे. हे साहित्यिकांना अपेक्षित नसल्याचे सबनीस म्हणाले. याप्रसंगी कादंबरीकार शेषराव शंकरराव खाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विजया मारोतकर, चरणदास वैरागडे, आनंदी चौधरी, मंगेश बावसे, अरुणा कडू, पल्लवी उमरे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश बावसे व विकास गजापुरे यांनी केले तर आभार विशाल देवतळे यांनी मानले.
साहित्य संमेलने कंटाळवाणी
साहित्य संमेलने कंटाळवाणी होत असतील, तर त्यात राजकारण्यांनी कशाला यावे, असा प्रश्न पडतो आहे. याचा विचार आयोजकांनी करणे अपेक्षित असून, वर्तमानात इंग्रजी ही ज्ञानाची व व्यवहाराची भाषा असली तरी मायमराठी विसरून चालणार नाही, अशी भावना माजी कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.
सत्याचा शोध घेण्याची भूमिका हवी
जगात बायडेन, पुतिन, जेलेन्स्की यांचे वेगवेगळे गट आहेत. मात्र शेक्सपियर, ज्ञानेश्वर, तुकाराम हे कोणत्याही गटाचे नसूनही संपूर्ण जगाचे नायक आहेत. तिसऱया विश्वयुद्धाची ठिणगी कधीही पडेल. त्या पार्श्वभूमीवर सत्याचा शोध घेण्याची भूमिका अशा संमेलनातून प्रसारित व्हायला हवी. वैज्ञानिक प्रतिभावंत आहेत. मात्र, ते नव्या हिटलरच्या हातात जीवघेणी हत्यारे सोपवत आहेत. ते माणुसकीचे मारेकरी झाले असून, त्यांच्यासारखा हा कृतघ्नपणा जगाच्या इतिहासात कधीही झालेला नसल्याचे सबनीस यावेळी म्हणाले.


























































