लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना अजित पवार गटाकडून आता राज्यसभेत पाठविण्यात येणार आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर विधान भवन परिसरात सुनेत्रा पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांना प्रॉम्टिंग केले.
राज्यसभेसाठी आतापर्यंत इतर कुठल्याही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे तुमचा विजय पक्का समजायचा का, असा प्रश्न पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना विचारला. यावर आदिती तटकरे यांनी हळू आवाजात 18 तारखेपर्यंत मुदत आहे, असे मागून सांगितले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 18 तारखेपर्यंत मुदत आहे, असे उत्तर दिले.
असा झाला संवाद, तुमची राज्यसभेवर बिनविरोध निवड होईल का?
आदिती तटकरे ः 18 तारखेपर्यंत कोणतेही वक्तव्य करणार नाही.
सुनेत्रा पवार ः 18 तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे मला वाट बघावी लागेल. त्यानंतरच मी याबाबत वक्तव्य करेन.
तुमचा विजय जवळपास निश्चित झालाय असं समजायचं का?
आदिती तटकरे ः पक्षाचे आभार मानते…
सुनेत्रा पवार ः पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष, पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी…
आदिती तटकरे ः महायुतीचे नेते
सुनेत्रा पवार ः महायुतीचे सर्व नेते, सहकारी, कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचे मी आभार मानते.
तुम्हाला उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील नेते आणि मित्र पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे, खरंच पक्षात कोणी नाराज आहे का?
आदिती तटकरे ः अशी नाराजी नाही.
सुनेत्रा पवार ः अशी नाराजी नाही, मला अशी नाराजी कुठेही दिसलेली नाही. पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतला आहे.
आदिती तटकरे ः मला महायुतीच्या सर्व नेत्यांनी शुभेच्छा दिल्यात, माझा फॉर्म भरायला भुजबळसाहेब सर्वात आधी आले.
सुनेत्रा पवार ः छगन भुजबळ माझा उमेदवारी अर्ज भरताना माझ्याबरोबर उपस्थित होते. त्यांनीही मला शुभेच्छा दिल्यात. त्यामुळे मला असं वाटतंय की, नक्कीच कोणीही नाराज नाही.
अजित पवार तुमच्या उमेदवारीस तयार नव्हते का?
आदिती तटकरे ः हळू आवाजात पुटपुटल्या…
सुनेत्रा पवार ः माझ्या उमेदवारीबाबत जनतेतून मागणी होत होती. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांनीदेखील अशी मागणी केली होती. मात्र मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती केली की, माझ्या उमेदवारीचा अग्रह धरू नये. लोकसभेच्या उमेदवारीची मागणीदेखील जनतेतूनच झाली होती. या वेळीदेखील तेच झालं.
पार्थ पवार या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र आता तेदेखील नाराज असल्याची चर्चा आहे… त्याबद्दल काय सांगाल?
आदिती तटकरे ः त्यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत.
सुनेत्रा पवार ः पार्थ पवार यांनी स्वतःच सांगितलं की, कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे. स्वतः पार्थ पवार यांचादेखील तसाच आग्रह होता.