
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन व माखजन इंग्लिश स्कूल माखजन, ॲड . पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,इंग्लिश मीडियम स्कूल माखजनने 1 लाख 51 हजार सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प 12 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून प्रशालेत सूर्यनमस्कार संकल्पाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला भरतकुमार आंबेटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना हरिद्वार येथील योगपीठ, गीता परिवार, क्रीडा भारती, हार्टफुलनेस संस्था ,नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन या पाच संस्थांनी 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोडला आहे. या संकल्प यज्ञात एक समिधा म्हणून माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने 1 लाख 51 हजार सूर्यनमस्कार घालण्याचे निश्चित केल्याचे संस्थेचे अध्यक्ष आनंद साठे यांनी सांगितले. विद्यार्थी आरोग्य संपन्न होण्यासाठी हा संकल्प करण्यात आला आहे.
या शुभारंभाच्या कार्यक्रमात प्रशालेच्या पटांगणात सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे भरतकुमार आंबेटकर, संस्थेचे सचिव राजेश फणसे, शिक्षक ओंकार नामजोशी, सचिन साठे विद्यार्थ्यांसोबत सहभागी झाले होते. सूर्यनमस्कार घालून झाल्यावर प्रमुख पाहुणे भरतकुमार आंबेटकर यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. शिष्यवृत्ती स्पर्धेत गुणवत्ता यादीत आलेल्या समता जाधव हिला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव परब यांनी केले.व्यासपीठावर संस्था सचिव राजेश फणसे, सदस्य सतीश साठे, मुख्याध्यापक मनोजकुमार नार्वेकर, पर्यवेक्षक गणेश शिंदे, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत उपस्थित होत्या. सूर्यनमस्कार संकल्पाचे प्रतिनिधित्व प्रशालेचे शिक्षक नानासाहेब ठोंबरे, सचिन साठे करीत आहेत. सूत्रसंचालन मालती गुरव यांनी तर आभार गौरव पोंक्षे यांनी मानले.



























































