पाकिस्तानकडून सीमाभागात गोळीबार; 10 नागरिकांचा मृत्यू, तीस जखमी, मृतांमध्ये मुलांचाही समावेश

border

मंगळवारी रात्री जम्मू आणि कश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केला, ज्यामध्ये 10 नागरिक ठार झाले आणि सुमारे 30 जण जखमी झाले, अशी माहिती हिंदुस्थानी लष्कराकडून देण्यात आली आहे. तसेच हिंदुस्थानी लष्कराकडून ‘चोख प्रत्युत्तर’ देण्यात आल्याचेही लष्कराने सांगितले.

मृतांमध्ये 12 वर्षांची मुलगी आणि 10 वर्षांचा मुलगा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हल्ल्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी सीमेलगतच्या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना भेटतील.

मृतांमध्ये मोहम्मद आदिल, सलीम हुसेन, रुबी कौर, मोहम्मद अक्रम, अमरिक सिंग, रणजित सिंग, मोहम्मद रफी आणि मोहम्मद इक्बाल यांचा समावेश आहे. ठार झालेल्या मुलांमध्ये मोहम्मद जैन आणि झोया खान यांचा समावेश आहे.

हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा चालवणाऱ्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर हल्ले केल्यानंतर काही तासांतच पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला.