बीड जिल्ह्यात फैलावत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. 10 दिवसांसाठी संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला. जाहीर करण्यात आलेल्या या लॉकडाऊनची अंमलबजावणी कठोरपणे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दररोज जिल्ह्यात अडीचशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 25 मार्चच्या मध्यरात्रीपासून 4 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
या लॉकडाऊनमध्ये उद्याने, बगीचे, मोकळ्या जागा, उपहार गृह, दारूचे दुकान, रेस्टॉरंट, लॉज, मॉल, हॉटेल, व्यापारपेठ, केशकर्तनालय, ब्युटीपार्लर, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग, सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने पूर्णपणे बंद राहणार आहेत. जिल्ह्याभरातील कन्स्ट्रक्शनची कामेही बंद करण्यात येतील. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह, मंगल कार्यालय, लग्न समारंभ, स्वागत समारंभ, धार्मिक, राजकीय, सामाजिक सभा, कार्यक्रम, मंदिरे, प्रार्थनास्थळे संपूर्ण बंद राहतील असे आदेश जारी करण्यात आले आहेत.




























































