
मुंबईत नाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा, डेब्रीज रोखण्यासाठी आता नाल्यांभोवती 10 फुटांच्या स्टीलच्या मजबूत जाळय़ा बसवण्यात येणार आहेत. वांद्रय़ातील पी अँड टी कॉलनी नाल्यापासून या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केली जाणार आहे. यामुळे पालिकेची नालेसफाई परिणामकारक होणार असून मुंबईकरांची पाणी तुंबण्यातून सुटका होण्यास मोठी मदत होणार आहे.
मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याच्या ठिकाणांमध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेक वेळा भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्तालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र छोटय़ा नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. यातच मोठय़ा प्रमाणात कचरा, डेब्रीज बेजबाबदारपणे नाल्यात टाकण्याचे प्रकार घडतात. नाल्यात मोठमोठे बेड-सोफे, खाटा, खुर्च्या, गाद्या आदी टाकले जातात. शिवाय सर्वाधिक प्रमाणात प्लॅस्टिक आणि कचराही टाकला जातो. यामुळे पालिकेने कितीही नालेसफाई केली तरी काही दिवसांतच नाल्यामध्ये टाकल्या जाणाऱया वस्तूं-कचऱयामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. यामुळे काही वेळा जनजीवन विस्कळीत होऊन मुंबई ठप्प होण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे नाल्यांना 10 फूट उंच मजबूत स्टीलची जाळी बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील नदी, नाले
1. मुंबईत एकूण नद्या – 5
2. छोटे नाले – 1508 (लांबी 605 किमी)
3. मोठे नाले – 309 ( लांबी 290 किमी)
4. रस्त्याखालील ड्रेनेज – 3134 किमी




























































