
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा आज सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन सुरळीत पार पडल्या. देशभरातील साडे दहा लाखांवर उमेदवार या परीक्षेला बसले होते. यंदाचा पेपर फार कठीणही नव्हता आणि सोपाही नव्हता अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली. गतवर्षीच्या पूर्व परीक्षेचाच पॅटर्नसारखाच यंदाचा पेपर होता असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपीएससीने सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली होती. सोशल डिस्टन्सिंगच्या बंधनामुळे यावर्षी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. 72 केंद्रे आणि अडीच हजार उपकेंद्रांवर परीक्षा घेतली गेली. उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचता यावे म्हणून महाराष्ट्र, दिल्लीप्रमाणे अन्य राज्य सरकारांनी त्यांना लोकलमधून प्रवेश करण्याची मुभा दिली होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे परीक्षा केंद्रे बदलून घेण्याची सवलत देण्यात आली होती. सुमारे साठ हजार विद्यार्थ्यांनी त्या सवलतीचा लाभ घेतला. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांना 8 जानेवारी 2021 रोजी होणाऱया मुख्य परीक्षेला बसता येणार आहे. परीक्षेचा कट-ऑफ यूपीएससीच्या वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे.































































