समृद्धी महामार्गावर 10 ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे : संभाजी पाटील निलंगेकर

346

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर बांधकाम क्षेत्राशी संबंधित दहा कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. भारतीय उद्योजक महासंघाच्या (सीआयआय) च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटील म्हणाले, राज्य शासनाने उभारलेल्या पायाभूत सुविधांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी विविध उपक्रमावर भर दिला आहे. कौशल्य विकास विभागाच्या सर्व योजनांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी लागणारे अभ्यासक्रम उद्योगांनीच तयार करून घ्यावे, अशी सूचना आम्ही केली आहे. अशा अभ्यासक्रमाना पंधरा दिवसात मान्यता देण्यात येईल. तसेच उद्योगासाठी आवश्यक प्रशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये प्रशिक्षणासाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.

आयटीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. त्यामुळे त्यावर भर देण्यात येत आहे. तसेच राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच राज्यातील विविध विभागात एकूण सहा कौशल्य विकास विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय मंत्री पांडे म्हणाले, कुशल हिंदुस्थानच्या माध्यमातून केंद्र शासन कौशल्यपूर्ण युवकांची फळी तयार करत आहे. त्यासाठी उद्योजकांना मोठ्या सुविधाही देण्यात येत आहेत. तसेच ॲप्रेंटिस कायद्यामध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. सिंगापूरमधील ॲप्रेटिंसचा पॅटर्न देशातही राबविण्यात येणार आहे. यावेळी विविध कंपन्यांनी नोकरी दिलेल्या युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मनोहर नाथ पांडे, केंद्रीय सचिव के. पी. कृष्णन, राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सीआयआयच्या चेअरमन काश्मिरा मेवावाला, आदी यावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या