१०८ रूग्णवाहिकेने वाचवले ३५ हजार रूग्णांचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राज्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवा म्हणजेच १०८ रूग्णवाहिका बीड जिल्ह्यातील रूग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. मोफत सेवेअंतर्गत पाच वर्षात बीड जिल्ह्यातील ८२ हजार ५७० रूग्णांवर उपचार करण्यात आले. तर ३५ हजार रूग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. १९ रूग्णवाहिकेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामिण भागात २४ तास सेवा उपलब्ध केली जात आहे.

केंद्र आणि राज्य सरकार बीव्हीजी ग्रुपच्या माध्यमातून १०८ रूग्णवाहिकेद्वारे रूग्णांना सेवा उपलब्ध करून देत आहे. फोन केला की अवघ्या दहा मिनिटात ही रूग्णवाहिका आपतकालीन व्यवस्थेसाठी सज्ज असते. अपघातामध्ये जखमी झालेले गर्भवती महिला, जळालेले रूग्ण, हृदयविकार अशा बारा प्रकारच्या आपतकालीन रूग्णांना त्वरित व योग्य उपचार देवून प्राण वाचावेत म्हणून २०१४ सालापासून ही सेवा सुरू आहे. या रूग्णवाहिकेमध्ये रूग्णांवर उपचार केले जातात तसेच गरज पडल्यास त्या रूग्णांना पुढील उपचारासाठी जवळच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात येते. १०८ रूग्णवाहिकेच्या अंतर्गत गर्भवती महिलांना सर्वात जास्त फायदा होत आहे. रोज २५ ते ३० गर्भवती महिलांना ही सेवा उपलब्ध होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २७ हजार ७६६ गर्भवती महिलांना या सेवेचा लाभ मिळाला आहे. एवढेच काय सहा हजार अपघाती रूग्ण, वादामध्ये जखमी झालेले ११७१ रूग्ण असे एकुण ८२ हजार ५७० रूगणांना ही सेवा पुरवण्यात आलेली आहे. या रूग्णवाहिकेच्या माध्यमातून ३५ हजार रूग्णांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आले आहे.

१०८ रूग्णवाहिकेचा लाभ घ्या
१०८ रूग्णवाहिका जिल्ह्यातील रूग्णांना जीवनदायी ठरत आहे. आतापर्यंत ८२ हजार रूग्णांना याचा फायदा झाला आहे. आणखी जास्त सुविधेचा आपतकालीन वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले आहे. तर १०८ रूग्णवाहिकेची जनजागृती व्हावी. ही रूग्णवाहिका रूग्णांसाठी अतिशय सोयीस्कर आहे असे आपतकालीन समन्वयक अभिजित सारणीकर यांनी म्हटले आहे.