
शाळेचे प्रगतिपुस्तक समाधानकारक नसल्याने त्याने शक्कल लढवली. प्रगतिपुस्तकात खाडाखोड करून त्यावर आईची स्वाक्षरी घेतली आणि ते शाळेत दिले. मात्र वर्ग शिक्षकाने त्याची ही लबाडी पकडली आणि त्याच्या वडिलांना त्याबाबत सांगितले. आता आपली काही खैर नाही, वडील काही सोडत नाही या भीतीने त्याने घर सोडले. सात दिवस तो भटकत होता, पण भोईवाडा पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करून त्या मुलाला शोधून पुन्हा पालकांच्या स्वाधीन केले.
परळ येथे राहणारा रामनाथ (15, नाव बदललेले) हा मुलगा दादर येथील एका प्रतिष्ठत शाळेत इयत्ता दहावीत शिकतोय. 26 सप्टेंबर रोजी दुपारी क्लासला गेलेला रामनाथ घरी परतलाच नाही. बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने त्याच्या पालकांनी भोईवाडा पोलिसांत मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन बोरसे, कदम, म्हेत्रे तसेच पवार, घस्ते, गावकर, साळुंखे, काटे, बिडवे, तडवी, रणधीर या पथकाने रामनाथचा शोध सुरू केला. अखेर सहा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आज दुपारी पोलिसांनी त्याला शोधून काढले व सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. तो कधी दादर तर कधी गिरगाव चौपाटी अथवा गार्डनमध्ये झोपायचा. रेल्वेचा प्रवास कधी न केल्याने त्याला प्रवास करायला आवडू लागले होते. त्यामुळे तो दररोज चर्चगेट ते दादर असा प्रवास करत होता. पण आठवडय़ानंतर पोलिसांनी त्याला शोधून घरवापासी केली.
क्लासला गेला अन् सटकला
रामनाथला शाळेतून प्रगतिपुस्तक मिळाले होते, पण कामगिरी समाधानकारक नसल्याने त्याने त्या प्रगतिपुस्तकात खाडाखोड करून आपल्याला हवे तसे करून घेतले. त्याने प्रगतिपुस्तकावर आईची स्वाक्षरी घेतली पण वर्गशिक्षकाने त्याची बनवाबनवी पकडली. शिक्षकाने त्याच्या वडिलांना रामनाथचा प्रताप सांगून भेटण्यासाठी शाळेत बोलावले. रामनाथने याचा धसका घेतला. शाळेतून घरी गेल्यानंतर त्याने पॉकेटमनीमधून साठवलेले पैसे आणि कपडे बॅगेत भरून परळमध्येच असलेल्या क्लासला गेला, पण क्लास सुटल्यानंतर तो बेपत्ता झाला.
चेहरा ओळखणाऱ्या अॅपचा फायदा
बोरसे व त्यांचे पथक रामनाथचा कसून शोध घेत होते, पण त्याचे थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तो दादर रेल्वे स्थानकात दिसल्याची माहिती बोरसे यांना मिळाली. मग त्यांनी सीसीटीव्ही तपासल्यावर त्यात रामनाथ दिसून आला. त्यानंतर रेल्वे स्थानकात असलेल्या चेहरा ओळखणाऱ्या सिस्टममुळे रामनाथ चर्चगेट ते दादर असा गेल्या सहा दिवसांपासून रोज प्रवास करीत असल्याचे आढळले. हाच धागा पकडून पोलिसांनी आज दादर, मरिन लाइन्स स्थानकात सापळा रचला. नेमका तो आज दादरला आला आणि मुंबई सेंट्रल येथे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे तो स्वामिनारायण मंदिराजवळ आला आणि बोरसेंच्या हाती लागला.






























































