यंदा अकरावी प्रवेशात बदल, प्रवेश प्रक्रिया लांबणार नाही; प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे यंदा दहावीचा निकाल उशीराने जाहीर होणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. यंदा प्रवेशप्रकिया लांबणार नसून दरवर्षी आयोजित होणारी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी रद्द करण्यात आली आहे. अकरावीच्या नियमित फेऱ्या पार पडल्यानंतही महाविद्यालयात जागा शिल्लक राहिल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी राबविण्यात येत होती. मात्र, यंदा कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने ही फेरी रद्द करण्यात आली आहे. गरज भासल्यास विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल तसेच या फेऱ्यांना आरक्षण लागू नसेल असे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जीआरमध्ये म्हटले आहे.

मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक, संभाजीनगर येथे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होते. जूनमध्ये सुरू झालेले प्रवेश वाढणाऱ्या प्रवेश फेऱ्या, विद्यार्थ्यांच्या तक्रारी यांमुळे प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत लांबते. यंदा जुलै अखेरीस दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील दीड महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, लांबलेले शैक्षणिक वर्ष यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर संपवणे आवश्यक आहे. यंदा सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेचे माहिती पुस्तक उपलब्ध करून देणे, अर्ज भरणे यांपासून ते प्रवेश शुल्क भरणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असून त्या अनुषंगाने बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाइन अर्जात अपलोड करता येणार आहेत.

पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के जागा
मुंबई आणि पुणे महापालिकेच्या ज्युनिअर महाविद्यालयांतील पन्नास टक्के जागा या पालिकेच्या शाळेतून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहणार आहेत. स्थानिक परिस्थिती, विद्यार्थ्यांना होणारे लाभ, या मुद्द्यांची तपासणी करून संचालकांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे.

  • सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) यंदा 12 टक्के जागा राखीव.
  • अपंग विद्यार्थ्यांसाठी 4 टक्के जागा राखीव

प्रवेश फेऱ्यांचे स्वरुप

  • द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील
  • नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील.
  • विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील
  • नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील