
गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर आला असताना मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचा परवान्यासाठी करण्यात येणाऱया अर्जांना थंडा प्रतिसाद असल्याचे समोर आले आहे. 20 ऑगस्टपर्यंत पालिकेकडे एकूण 1152 अर्ज आले असून आतापर्यंत 227 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर 721 अर्ज परवानगी प्रक्रियेमध्ये असल्याची माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.
मुंबईत सुमारे 11 हजार गणेशोत्सव मंडळे आहेत. यातील सुमारे 3500 मंडळे मंडप बांधून उत्सव साजरा करतात. या सर्व मंडळांना पालिकेची परवानगी घेऊन उत्सव साजरा करावा लागतो. मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी तिसऱया लाटेच्या इशाऱयामुळे प्रशासनाने गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीदेखील कोरोना खबरदारी घेऊनच उत्सव साजरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे धूमधडाक्यात आणि जल्लोषात साजऱया होणाऱया उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. पालिकेकडे परवानगीसाठी आलेल्या अर्जांपैकी आतापर्यंत 22.06 टक्के परवानगी देण्यात आली आहे. तर 7.87 टक्के अर्ज विविध अटींची पूर्तता करीत नसल्यामुळे नाकारण्यात आले आहेत. तर 70.07 टक्के अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
आता ऑनलाइन परवानगी
गणेशोत्सव मंडळांना पालिकेने या वर्षी 21 जुलैपर्यंत ऑफलाइन परवानगी मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तर सद्यस्थितीत ऑनलाइन परवानगीसाठी अर्ज करता येत आहेत. कोरोनामुळे या वर्षी मंडळांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
पालिकेने मंडळांसाठी एक खिडकी योजना लागू केली आहे. दरवर्षी मंडळांना अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत होते, मात्र या वर्षी परवानगी घेण्याची गरज नसून गेल्या वर्षीच्याच आधारावर परवानगी देण्यात येत आहे.
अशी आहे सद्यस्थिती
आतापर्यंत
आलेले अर्ज 1152
परवानगी दिली 227
पडताळणी
प्रक्रियेत अर्ज 1029
परवानगी नाकारली 81
परवानगी प्रक्रियेत 721





























































