मी चांगला व्यक्ती होऊ शकलो नाही, मला माफ करा; 12 वी च्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अंबाजोगाई

आयुष्यात मी चांगला व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो’ असे भिंतीवर लिहून अंबाजोगाईतील बारावीच्या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेतला. ही घटना बुधवारी सायंकाळी योगेश्वरी नगरी भागात उघडकीस आली.

गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे (वय 18) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गुरुप्रसादचे वडील अंबाजोगाई येथीलच एका शाळेत शिक्षक आहेत. गुरुप्रसादच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाल्यामुळे घरात फक्त तो आणि त्याचे आई-वडीलच असतात. हे कुटुंब योगेश्वरी नगरीमध्ये ‘शरयू’ इमारतीत फ्लॅटमध्ये राहते. गुरुप्रसाद सध्या योगेश्वरी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता.

दुपारी 4 च्या सुमारास गुरुप्रसादने अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. त्यानंतर भिंतीवर आई-वडिलांसाठी संदेश लिहून ठेवत त्याने दोरीच्या साहाय्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी 7 वाजता आई-वडील घरी परतले. अनेकदा आवाज देऊनही गुरुप्रसाद दरवाजा उघडत नसल्याने अखेर त्यांनी दरवाजा तोडला आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

आय क्विट..’ : “या जगात राहणे आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक अवघड असते. मी नेहमीच एक चांगला व्यक्ती बनण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी मी अयशस्वी ठरलो. मॉम, डॅड.. मी तुमचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मला माफ करा. या परिस्थितीत मी जगू शकत नाही. आय क्विट.. (मी निरोप घेत आहे)” अशा आशयाचा संदेश गुरुप्रसादने आत्महत्येपूर्वी भिंतीवर इंग्रजीत लिहून ठेवला आहे