
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 26 मार्च या कालावधीत मुंबईत 12 वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा महोत्सव भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे.
यशवंत महोत्सवाचे उद्घाटन 21 मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख उपस्थित राहतील. यावेळी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल तसेच प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले उपस्थित राहतील. महोत्सवात जागतिक पातळीवरील 30, हिंदुस्थानी 5 आणि मराठी 5 असे एकूण 40 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने फ्रान्स, इंडोनेशिया, जर्मनी, इस्रायल, रशिया, हंगेरी, सौदी अरेबिया, इटली, ब्रिटन, रोमानिया, ब्राझिल, स्पेन आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कोरोनानंतर मुंबईत होणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे.



























































